संगीत नाटक ही महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली अमूल्य देणगी आहे. याच संगीत नाटकाच्या प्रेरणेने
नारायणराव जाधव, जयराम शिलेदार व प्रमिला जाधव या तीन नाट्यवेड्या कलाकारांनी १ ऑक्टोबर १९४९ रोजी
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर 'मराठी रंगभूमी, पुणे' या संस्थेची स्थापना केली. पहिला प्रयोग 'संगीत सौभद्र' या
नाटकाचा झाला. तेंव्हापासून आजतागायत मराठी रंगभूमी ही संस्था सातत्याने संगीत नाटके सादर करत आहे .
‘मराठी रंगभूमी, पुणे’ या आपल्या संस्थेला या वर्षी ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. विजयादशमीच्या मुहूर्तावर १ ऑक्टोबर १९४९ साली हा संगीतमय प्रवास सुरू झाला.या प्रवासात रसिक प्रेक्षक, गुणवंत साथीदार यांच्या सहकार्याने ही स्वरलता उत्तरोत्तर कीर्तिमान होऊन रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये आजही बहरलेली आहे. ही रंगभूमी केवळ एक रंगमंच नसून एक अविट गोडी असलेला, सुरांनी व अभिनयाने नटलेला असा एक न संपणारा संगीत सोहळाच आहे.
आज 75 वर्षे पूर्ण करताना रसिक प्रेक्षकांसमवेत आम्ही हा सोहळा साजरा करणार आहोत. त्यानिमित्त मुंबई येथे एका नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची रूपरेखा पुढीलप्रमाणे असेल.
रसिक प्रेक्षक या भक्कम पायावर मराठी रंगभूमी दिमाखात वाटचाल करीत आहे, तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी आपला भरभरून प्रतिसाद देऊन या सोहळ्याचा आनंद वृद्धिंगत करावा.
दीप्ती भोगले म्हणजेच पूर्वाश्रमीच्या लता शिलेदार. लता ताई एक कलासक्त व्यक्तिमत्व. आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत लता शिलेदार आणि कीर्ती शिलेदार या दोन भगिनींनी संपूर्ण आयुष्य नाट्यसंगीताची, रंगभूमीची सेवा केली. संगीतावरील त्यांचे प्रभुत्व आपण सर्व जाणतोच त्यांचे संगीताव्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टीत प्राविण्य आहे . मग ते सुंदर चित्र रेखाटणे असो नाहीतर संगणकावर विडिओ एडिट करणे असो. रंगमंचावर सादर केलेली रागदारी लताताई जितक्या सहजतेने साकारत तितकेच कागदावरहि त्यांचे हात सहज फिरत त्याच सहजते त्या संगणकावरील वेगेवेगळी सॉफ्टवेअर हाताळतात . सध्याच्या काळातली नवनवीन तंत्र सुद्धा त्या लीलया हाताळतात संगीत नाटकयाच्या सादरीकरणामध्ये जे जे आवश्यक आहे ते ते त्यांनी लीलया आत्मसात केले. लताताई म्हणजे मराठी रंगभूमीस वाहून घेतलेले व अजूनही त्याच जोमाने कार्यरत असलेले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे.आज लता ताईंना संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन. .
गानतपस्विनी जयमाला शिलेदार याच्या ९६ व्या जन्मदिनी पूजनीय अण्णासाहेब किर्लोस्कर याच्यावर आधारित 'नाट्यब्रह्म' हा लघुचित्रपट प्रकाशन सोहळा रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वा. सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, शिवाजीनगर येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते श्री .विजय गोखले यांनी आपला बहुमूल्य वेळ कार्यक्रमास दिला. तसेच श्री. सुभाष सराफ हे देखील आपला बहुमूल्य वेळ देऊन कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ष जोगळेकर यांनी केले आहे.
उत्कृष्ठ लेखन व प्रभावी दिग्दर्शन अशा दोनही जबाबदाऱ्या दीप्ती भोगले यानी अतिशय सुरेख पार पडल्या आहेत.
मुंबई दुरदर्शन, सह्याद्री वाहिनी,'मराठी रंगभूमि पुणे' निर्मित, ग॔धर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रकाशित, 'संगीत सुवर्णतुला' या नाट्यसंगीताचे ५ ऑगस्ट २०२२, संध्याकाळी ७.३० वाजता, ६ ऑगस्ट २०२२, दुपारी १.३० वाजता. दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर सादरीकरण झाले या नाट्यसंगीताचे लेखन विद्याधर गोखले यांचे आहे. दिग्दर्शन दीप्ती भोगले यानी केले आहे. संगीतास कीर्ती शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. संकल्पना : श्री. नीरज अगरवाल, अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, दुरदर्शन मुंबई दुरदर्शन निर्माता-दिग्दर्शन : श्री भारत हरणखुरे
सुरवातीस या संस्थेचे स्वरूप बिऱ्हाडी स्वरूपाचे होते. ११ कुटुंबे या संस्थेमध्ये रहात होती १९५८ सालापासून बिर्हाडी स्वरूप बंद होऊन नाईट पद्धतीने कंपनीचे प्रयोग सुरु झाले. श्री. जयराम व त्यांची सहचारिणी जयमाला शिलेदार म्हणजेच पूर्वाश्रमीच्या प्रमिला जाधव यांनी अनेक चढउतार सहन करीत जुन्या नाटकांसमवेत १८ नवीन नाटके रंगभूमीवर आणली. या नाटकांद्वारे मराठी रंगभूमी या संस्थेने अनेक गुणी कलावंत नवीन नाटककार आणि संगीतकार रंगभूमीस प्रदान केले. जयमाला शिलेदार यांनी तर सतत २५ वर्षे नायिका म्हणून रंगभूमी गाजविली. त्यांच्या कार्याचा गावोगावी सत्कारही झाला.
जयराम व जयमाला शिलेदार यांच्या संगीत साधनेवर प्रसन्न होवून परमेश्वराने त्यांना 'लता' व 'कीर्ती' नावाची दोन गानरत्ने प्रदान केली. या दोनही कन्यांनी अगदी लहान वयातच संगीत नाटक व मराठी रंगभूमीच्या सेवेस अतिशय उत्साहाने सुरवात केली. आपला चुलत भाऊ 'सुरेश' याच्या समवेत या कन्यांनी 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकाचे या भावंडानी अनेक प्रयॊग यशस्वीपणे पार पाडले. या लहान शिलेदाराच्या या सुंदर उपक्रमाचे विद्वान रसिक प्रेक्षकांनी अतिशय कौतुक केले.१९७० साली या दोनही कन्या खऱ्या अर्थाने संगीत रंगभूमीवर कार्यरत झाल्या. मराठी रंगभूमीने या शिलेदार भगिनींच्या साथीने नवयुवकांची दुसरी पिढीचं तयार केली
मराठी रंगभूमीने संगीत अभोगी व श्रीरंग प्रेमरंग (लेखक : चि. त्र्यं. खानोलकर ), संगीत मंदोदरी ( लेखक :गो.नि. दांडेकर), संगीत चंद्रमाधवी ( लेखिका : दीप्ती किरण ) हि अत्याधुनिक संगीत नाटकेही रंगभूमीवर आणली. कीर्ती शिलेदार यांची संकल्पना आणि सादरीकरण असलेला 'सखी मीरा' हा एकपात्री संगीत नाट्याविष्कार ही संस्थेची अभिमानास्पद निर्मिती आहे. स्वयंवर, सौभद्र, शारदा, शाकुंतल, संशयकल्लोळ, मृच्छकटिक, एकच प्याला, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, कान्होपात्रा, मानापमान अशा गंधर्व परंपरेतील सर्व गाजलेल्या नाटकांची नायिका म्हणून कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभुमी गाजविली.